निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 05:33 PM2019-04-09T17:33:43+5:302019-04-09T17:34:45+5:30
24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश
मुंबई: टीव्ही मालिकांमधून भाजपाचा प्रचार केल्याप्रकरणी दोन निर्मात्यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या मालिकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याबद्दल काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगानं दोन्ही मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत.
भाभीजी घर पर है आणि तुझसे हे राबता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याचा दावा काँग्रेसनं केला होता. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसनं मालिकेच्या निर्मात्यांवर आणि चॅनेलवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 'भारतीय जनता पार्टीचं राजकारण दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहे. प्रचारासाठी भाजपाकडून कार्यक्रमाचा वापर करण्यात करण्यात येत आहे. पराभवाच्या भितीने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे भाजपा अशाप्रकारे मालिकांच्या माध्यमातून प्रचाराचं तंत्र वापरत आहे,' असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं.
सध्या देशभरात राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करत असतात. भाजपाकडून आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट, ट्रेनमधील ‘मैं भी चौकीदार’ लिहिलेले चहाचे कप, 'नमो टीव्ही’, तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते.