ECI on Vote Jihad Controversy: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. पराभवाची कारणे सांगताना भाजपा नेत्यांकडून सातत्याने व्होट जिहाद हा शब्दप्रयोग केला जात आहे. काही मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद झाला, असे दावे भाजपच्या नेत्यांकडून केले जात आहे. भाजपा एका विशिष्ट समूहाला टार्गेट करत असल्याची विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, याबद्दल जेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद बुधवारी झाली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीनी व्होट जिहाद शब्दाचा वापर भाषणातून केला जात असल्याच्या मुद्द्याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.
निवडणूक आयोग व्होट जिहाद शब्दाच्या वापराबद्दल काय म्हणाला?
व्होट जिहाद शब्दाच्या वापराबद्दल आयोगाचे अधिकारी म्हणाले, "आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपले मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपला कायद्यात काही ना काही म्हटलेलं आहे. कायद्याच्या बाहेर जाणारं विधान कुणी करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल."
"आपण जो प्रश्न विचारला की अमूक हे (व्होट जिहाद शब्द) कायद्याच्या बाहेर जाणार आहे की नाही. याचं उत्तर नक्की काय झालेलं आहे? पुरावे काय आहेत? याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावं लागतं", असे उत्तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या नेत्यांकडून असे दावे केले गेले की, मुस्लीम बहुल भागात व्होट जिहाद केला गेला. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मतदारसंघातील मतदानाचे आकडेवारीही याबद्दल पोस्ट केलेली आहे.