UP Election: उमेदवारी हवी तर ११ हजार अन् ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:51 AM2021-09-15T10:51:01+5:302021-09-15T10:53:37+5:30
या पत्रात काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असाल तर ११ हजार रुपये जमा करावे असं सांगण्यात आले आहे. हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील.
लखनौ – उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी(UP Election) सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष रणनीती आखत आहे. त्यातच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्जासोबत ११ हजार रुपये जमा करण्याची सूचना पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेशकाँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी याबाबत एक पत्र जारी केले आहे.
या पत्रात काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असाल तर ११ हजार रुपये जमा करावे असं सांगण्यात आले आहे. हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील. काँग्रेस पक्षाने निवडणुकीत तिकीट देण्यापूर्वी उमेदवारांसाठी निर्धारित फॉर्मेट निश्चित केला आहे. उमेदवाराला या फॉर्मच्या माध्यमातून निवडणूक कमिटीकडे अर्ज दाखल करावा लागेल. काँग्रेसने स्थानिक पातळीवर अशा कमिटी बनवल्या आहेत ज्यात न्याय पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या अध्यक्षांचा समावेश आहे. ही कमिटी उमेदवाराबाबत पुरेशी माहिती गोळा करुन रिसर्च करतील आणि त्याचा रिपोर्ट निवडणूक कमिटीकडे सोपवतील.
केवळ २ लोकांची नावं हायकमांडकडे जातील
स्थानिक कमिट्यांनी केलेल्या रिसर्चवरुन एक रिपोर्ट निवडणूक कमिटीकडे पोहचवला जाईल. या १० इच्छुक उमेदवारांचा समावेश असेल. त्यातील निवडणूक कमिटी १० पैकी ८ जणांची नावं रिजेक्ट करतील. त्यानंतर उरलेली २ नावं काँग्रेस(Congress) श्रेष्ठी म्हणजे उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्याकडे पाठवली जातील. ज्यातील एक नाव काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) निवडतील तोच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असेल.
फॉर्ममध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार?
काँग्रेस उमेदवारांना जो फॉर्म भरला जात आहे त्यात तुमचा राजकीय अनुभव काय आहे? तुम्ही किती वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करत आहात? तुमची पात्रता काय? काँग्रेसच्या धोरणांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? तुमच्या मतदारसंघात तुमची ओळख कशी आहे? तुमच्यावर कुठले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खटले नोंद आहेत का? त्याशिवाय तुम्हाला काँग्रेसचा उमेदवार का बनवावं? याबाबत थोडक्यात उत्तर द्या असंही फॉर्ममध्ये म्हटलं आहे.