हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामधील दुखणी जुनी असून, वरवरच्या उपायांनी ती दूर होणार नाहीत. काँग्रेस(Congress) पक्षाच्या संरचनेतच अनेक दोष आहेत, अशी टीका निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी केली आहे. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करताना काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षाला उभारी मिळेल अशी आशा काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी हे उद्गार काढले आहेत.
केंद्रातील सत्ताधारी भाजपने काँग्रेसपुढे उभे केलेले आव्हान, काँग्रेसमध्ये वाढलेला असंतोष अशा समस्यांमुळे हा पक्ष सध्या त्रस्त झाला आहे. त्यातच काँग्रेस राजकीयदृष्ट्याही दुबळी झाली आहे. त्या अनुषंगाने प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर टीका केल्याने आता त्यांना त्या पक्षात प्रवेश मिळणे शक्य नाही, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
गेल्या जुलै महिन्यापासून आजवर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात यावा. त्यांना विरोध करणाऱ्यांना पक्षांतर्गत सुधारणा नको आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घणाघाती टीका केली होती. या प्रखर विरोधामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेश व अन्य ठिकाणी उभारी मिळेल अशी आशा निर्माण झाली. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी त्या पक्षाच्या नेत्यांशी केलेली बोलणी निष्फळ ठरली आहेत. त्यामुळे ते या पक्षात जाण्याची शक्यता नाही, असे वृत्त लोकमतने ३० सप्टेंबर रोजी दिले होते.
त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही : काँग्रेसप्रशांत किशोर यांनी केलेली टीका काँग्रेस पक्षाला आवडलेली नाही. त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला प्रशांत किशोर यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही.