मुंबई : वीज खंडित होण्यामागे काही गाफीलपणा झाला आहे का, याच्या तपासणीचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना दिले आहेत. युद्धपातळीवर तीन-साडेतीन तासांतच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा सरकारने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली तर, रुग्णालये व रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत केल्याची माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली. बैठकीस ऊर्जामंत्री राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच संबंधित विभाग व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.अपघात की घातपात?वीज वाहिनीतील बिघाडानंतर आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले होते का, हा अपघात होता की घातपात, अशा प्रश्नांची सरबत्ती करत झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत 'वर्षा' निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत दिले. येत्या चार दिवसांत मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.