मुंबई : आमचा एकही आमदार फुटणार नाही असे विरोधक म्हणत आहेत, पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय ते दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी केला.पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा केला. विरोधी पक्षामध्ये मूळचे कमी आणि बाहेरचे लोक जास्त आहेत. त्यामुळेच या बाहेरच्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांची ही अस्वस्थता पाहता उद्या जर आम्ही काहीही न करता राजकीय भूकंप झाला तर त्याचे नवल वाटणार नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले. ५० वर्षांत इतके हतबल सरकार कधीही दिसले नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन राजकारणविरहित असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या पाच वर्षांत काय झालं ते सोडा, आता काय होणार आहे ते पाहा. बाळासाहेब सानप भाजपमध्ये गेल्याने काय होणार? ते आमच्यात होते तरी कुठला फायदा झाला, असा चिमटा त्यांनी काढला.
राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सेना भवन असेल, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 2:43 AM