मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांना आणखी कुठल्या सवलती व लाभ देता येतील यासाठी मंत्रिमंडळात शिफारसी करण्याकरिता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
या उपसमितीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मदत पुनर्वसन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे सदस्य असतील. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती आधीपासूनच कार्यरत आहे. त्या धर्तीवर ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी आदेश काढण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन अशी उपसमिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ओबीसी समाजाचे आरक्षण आणि देण्यात येणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचा ही समिती अभ्यास करेल त्यांची परिणामकारक अंमलबजावणी तसेच ओबीसींना आणखी कोणत्या सवलती व लाभ देता येतील याबाबत मंत्रिमंडळात शिफारसी करेल.