मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. अजित पवार हे नुसतं नाव ऐकलं तरी करड्या शिस्तीच्या दादांची करारी छबी डोळ्यासमोर येते. कडक खर्जातला जरब बसविणारा आवाज कानात घुमतो. त्यांची तीक्ष्ण नजर अगदी थेट आर-पार गेल्याचा आभास होतो. मात्र या कडकशिस्तीच्या अजितदादांमध्ये मायेची, आपलेपणाची प्रचिती उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या सर्व स्टाफने अनुभवली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष येऊ नये, पुष्पगुच्छ पाठवू नये, गर्दी जमवू नये, असं जाहीर आवाहनच त्यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांच्या अनेक चाहत्यांची, कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवसभराचं कार्यालयीन कामकाज संपताना मंत्रालयातल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात अजित पवारांची बैठक होती. अजित पवारांच्या सर्व बैठका, नियोजीत भेटी झाल्यावर कार्यालयातले कर्मचारी नेहमीपेक्षा जास्तच वेळ उगीचच रेंगाळत असल्याचं दादांच्या लक्षात आलं. तेव्हा काय आहे...? असं नेहमीच्या दादा स्टाईलमध्ये त्यांनी विचारलं. त्यावर कुणीतरी अगदी भीतभीतचं काही नाही, शुभेच्छा द्यायच्यात असं धाडस करुन सांगितलं. त्याला सावरुन घेत तिथं उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयातल्या स्टाफला आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात असं सांगितलं. त्यावर ठिक आहे, चला. असा प्रेमळ दमच त्यांनी भरला.
कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अगदी वैयक्तिक स्वरुपाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत अजित पवारांनी प्रत्येकासोबत फोटोसेशनही केलं. उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या अगदी चतुर्थश्रेणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून ते अति वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना एकच न्याय, कोणी मोठा नाही-कोणी छोटा नाही. प्रत्येकानं अगदी रांगेत येऊनच (सोशल डिस्टन्सिंग पाळत) अजित पवारांना शुभेच्छा दिल्या, त्या त्यांनी तितक्याच आपलेपणाने स्वीकारल्याही. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होतं. इतर वेळी अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजितदादांनी या कार्यक्रमामुळे आपलं वेळेचं नियोजन बिघडणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली होती.