"राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं", त्या व्हिडिओवरून फडणवीसांचा काँग्रेसला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:03 PM2021-07-10T19:03:48+5:302021-07-10T19:06:27+5:30
Devendra Fadnavis News: मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याचा प्रकार आज घडला होता.
मुंबई - पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरात झालेल्या बेसुमार वाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यातील विविध भागात आंदोलन केले होते. दरम्यान, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीनेही विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्यापेक्षा आंदोलनातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यावरून काँग्रेसच्या आंदोलनाचे हसे होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असून मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याचा प्रकार आज घडला होता. दरम्यान, आता या व्हिडीओवरून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (Even the bulls should not like Rahul Gandhi being called the national leader, Devendra Fadnavis slammed the Congress)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला.
इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.
या घटनेवरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.