मुंबई – अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही थेट उत्तर देणं टाळलं होतं, राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत आपले मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, नुसतं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काहीही उत्तर देऊ शकेन. राम मंदिराच्या लढ्यातील शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येला गेलो होतो. योगायोगावर माझी श्रद्धा आहे. २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा राम मंदिरात गेलो होतो. शिवनेरीवरील माती मी घेऊन गेलो होतो. त्यामुळे या विषयाला चालना मिळाली. हा विषय थंड पडला होता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा पण राम मंदिर बनवा, अशी आमची भूमिका होती. २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो आणी २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये हा प्रश्न सुटला, ही माझी श्रद्धा आहे. कुणाला अंधश्रद्धा म्हणायचं असे तर खुशाल म्हणावं, असे ही ते पुढे म्हणाले.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला मानपान सगळं मिळालं. तेही शिवसेनाप्रमुखांचां मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल. मी व्यवस्थित जाईन. मी पूजाआर्चा करून किंवा कार्यक्रमात सहभाग होऊन परत येईन. पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाही. एखाद्या गावातील मंदिर बांधायचं म्हटलं तर गावकरी एकदिलाने एकत्र येतात. त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत. लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचं काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
आता याबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे, राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही, सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या कारभारावर शरद पवारांची गुगली; महाविकास आघाडीत नेते नाराज असल्याची कबुली
राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान
शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण
सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर