Eknath Shind Reaction on Haryana Election Results: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातही पुन्हा महायुती सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. "जातीयवाद पराभूत झाला आणि विकासाचा विजय झाला. डबल इंजिनाची विजयी घोडदौड सुरूच आहे", असे शिंदे हरयाणातील विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. हरयाणाच्या जनतेने फेक नरेटिव्हला महत्त्व दिले नाही, असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातही पुन्हा महायुती सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची हरयाणा निकालावर पोस्ट काय?
एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, "जातीयवाद हरला, विकास जिंकला. डबल इंजिनची विजयी घोडदौड सुरूच आहे. हरयाणातील जनतेने सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवरील विश्वासावर शिक्कामोर्तब केले आहे."
"या निर्भेळ यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळाले", असे शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनता फेक नरेटिव्हच्या जाळ्यात अडकणार नाही -शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढे म्हटलं आहे की, "हरयाणातील जनताही अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी काँग्रेसच्या अत्यंत धोकादायक फेक नरेटिव्हला महत्त्व दिले नाही. भाजपाच्या विश्वासनीयतेला निवडले. महाराष्ट्रातील जनताही अशा बोगस नरेटिव्हच्या जाळ्यात अडकणार नाही आणि डबल इंजिन सरकारची विकास यात्रा महाराष्ट्रातही सुरूच राहिल, याची मला पूर्ण खात्री आहे", असे एकनाथ शिंदे हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना म्हणाले.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ३७ जागांपर्यंतच मजल मारता आली. आयएनएलडी पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, तीन अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.