बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्याने नाराज असणारे पार्थ पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेत होते. यामध्ये पार्थ यांची काका श्रीनिवास पवार यांच्या 'अनंतारा ' निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे .या चर्चेबाबत' लोकमत'शी बोलताना पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांनी सांगितले की सगळं व्यवस्थित असल्याचं वक्तव्य केलं आहे .
कणन्हेरी येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची उपस्थिती होती. यामध्ये पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता आले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काल रात्री साडेसात वाजता अचानक अजितदादा या ठिकाणी पोहचले. या वेळी पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेत नेमकं काय घडलं, पार्थ पवार यांची नाराजी दूर झाली का? याबाबत माहिती समजू शकलेली नाही.
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व पार्थ पवार हे बारामतीतच
शनिवारी दुपारी पार्थ पवार बारामती त्यांच्या काकू शर्मिला पवार यांच्याकडे आले होते, यावेळी स्नेहभोजन करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी सायंकाळी येथील 'गोविंदबाग ' निवासस्थानी पोहचणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यावेळी पार्थ शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांची भूमिका राष्ट्रवादीशी विसंगत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पार्थ पवार प्रकरण गाजत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणावेळी पार्थ पवारांनी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांच्या मागणीवर शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतली होती. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.
पार्थ पवार यांचे मौन तर गाठीभेटी सुरुच
पवार कुटुंबातील तणावाचे वातावरण येत्या दोन दिवसांत निवळेल. पार्थ पवार नाराज होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, आता ते शांत आहेत. शरद पवार हे त्यांच्या जागेवर योग्य असून पार्थ पवारही त्यांच्या जागेवर योग्य असल्याचे कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार कुटुंबात वाद असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला आहे. पवार कुटुंबात एकोपाच असतो. माध्यमांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...पुन्हा आबांनी मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही; रोहित पाटलांकडून आठवणींना उजाळा
मला माझं काम करु द्या, पार्थ प्रकरणावर बोलण्यास अजितदादांचा नकार
...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
खासदार राजन विचारेंच्या आव्हानाला मनसेचं प्रत्युत्तर; बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा आदरच आहे, पण...
कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा क्रम संशोधकांनी शोधला; डॉक्टरांना मिळणार मोठी मदत