काँग्रेसची 'न्याय' योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामा; नरेंद्र मोदींची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 01:45 PM2019-04-09T13:45:05+5:302019-04-09T13:45:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका केली आहे. काँग्रेसची न्याय योजना म्हणजे 60 वर्षांतील अन्यायाचा कबुलीनामाच असल्याचा घणाघात मोदींनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं जनतेला आश्वासन दिलं आहे की, जर आमचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं तर गरिबांना प्रतिमहिना 6 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. काँग्रेसनं या योजनेला न्याय असं नाव दिलं.
मुलाखतीत मोदींना न्याय योजनेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, त्यांचा मुख्य मंत्र हाच आहे की, आता होणार न्याय. म्हणजेच ते मान्य करतात 60 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेवर अन्याय केला. काँग्रेस जेव्हा न्यायाची भाषा वापरते, तेव्हा अनेकांना काँग्रेसनं न्याय दिलेला नाही हे प्रकर्षानं समोर येतं, 1984च्या शीख दंगल पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, तिहेरी तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना काँग्रेस न्याय देणार आहे काय?, काँग्रेसची ही योजना त्यांना न्याय मिळवून देईल काय?. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यांना 10 दिवसांत न्याय देतो, असं सांगण्यात आलं होतं, परंतु 100 दिवस झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय केव्हा मिळणार?, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.
भोपाळ गॅस दुर्घटना पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. प्रतिष्ठित वैज्ञानिक नंबी नारायणही काँग्रेसकडे न्याय मागत आहेत. ज्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात धाडण्यात आलं. काँग्रेस त्यांना न्याय देणार काय?, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवल्या गेलेल्या निरपराध लोकांना काँग्रेसनं न्याय दिला काय?, काँग्रेसनंच हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला. देशातील हिंदू न्याय मागत असताना त्यांना दहशतवादी का संबोधण्यात आलं. नरसिंह राव यांनी काँग्रेससाठी जीवन समर्पित केलं, परंतु त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात ठेवू दिलं नाही. नरसिंह राव यांची आत्मा काँग्रेसकडे न्याय मागत आहे?, असंही मोदी म्हणाले आहेत. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय योजनेवरून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.