Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:54 PM2021-04-29T19:54:51+5:302021-04-29T20:17:37+5:30
ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले.
नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी अनेक चॅनेल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून याठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.
मतदानाच्या टक्केवारीत कोण किती पुढे?
पक्ष | मतदानाची टक्केवारी |
भाजपा + | ४८ टक्के |
काँग्रेस + | ४० टक्के |
अन्य | १२ टक्के |
कोणाला मिळणार किती जागा?
भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज
भाजपा – ६१-६५ जागा
एजीपी – ९-१३ जागा
यूपीपीएल – ५-७ जागा
काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस – २४-३० जागा
एआययूडीएफ – १३-१६ जागा
बीपीएफ – ३-४ जागा
तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत होती. तर तिसरी आघाडी म्हणून आसाम जातीय परिषद आणि रायजोर दर मैदानात होतं. भाजपाच्या नेतृत्वात आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होती तर भाजपा आघाडीत सात जागांवर मैत्रीपूर्ण लढत होती. आज तकनं दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या आघाडीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बोडोलैंड पीपल्स फ्रंट, आंचणिक गण मोर्चा, आरजेडी, डावे पक्ष सहभागी होते. काँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. १० जागांवर काँग्रेस आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३, आसाम गण परिषद १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट १२ आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता.