नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल आले आहेत. या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी घोषित होतील. टाईम्स नाऊ सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपात अटीतटीची लढत आहे. परंतु ममता बँनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याची भविष्यवाणी केली जात आहे. तर इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल.
पश्चिम बंगालमध्ये ममतांचा एल्गार टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. सी वोटर नुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला १५२-१६४ जागा मिळतील. तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना १४-२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ५ राज्यांच्या एकूण ८२२ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या आहेत. बंगालमध्ये २ जागांवर उमेदवारांच्या मृत्यूमुळे मतदान बंद पडलं.
बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार – रिपब्लिक सीएनएक्सदरम्यान, रिपब्लिक-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाला १३८-१४८ जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. तर टीएमसीला १२६-१३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला ६-९ जागांवरच समाधान मानावे लागेल तर इतरांना १-३ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.
आसाममध्ये भाजपा सत्ता राखणारआसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी मतदान झाले. याठिकाणी बहुमतासाठी ६३ जागांची गरज आहे. इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार १२६ जागांच्या आसाममध्ये भाजपा आघाडी पुन्हा सत्तेत येईल. भाजपा आघाडीला ७५-८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ४०-५० जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यात १-४ जागा जाण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये पुन्हा एकदा डावे सरकार?केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार याठिकाणी डावे पुन्हा एकदा सरकार बनवण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणे दर ५ वर्षांनी सरकार बदलते. पण यंदा डावे डेमोक्रिटिक फ्रंट या ट्रेंडला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात. त्यांना ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ६१ जागांवर विजय मिळू शकतो. भाजपाला केरळमध्ये अवघ्या ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये स्टालिन सरकार?तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत यंदा सत्ता परिवर्तन होऊ शकते. डिएमकेला जबरदस्त यश मिळताना दिसत आहे. CNX एक्झिट पोलप्रमाणे डीएमके आघाडीला १६५ तर सत्ताधारी एआयडीएमके यांना केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागेल. तर इतरांना ६ जागा मिळू शकतात.