बिहार विधानसभा निवडणुकीबरोबर मध्य प्रदेशमध्येही 28 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागांवर 355 उमेदवार उभे राहिले होते. यापैकी सर्वच जागांवर काँग्रेस विरोधात भाजप अशीच लढाई पहायला मिळाली आहे. मतमोजनी 10 नोव्हेंबरला होणार असून इंडिया-टुडे अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपाची शिवराज सिंह चौहान यांचे सरकार सुरक्षित आहे. मात्र. शिंदे सरकार धोक्यात आले आहेत.
ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिंदे यांच्यासमोर भाजपात प्रस्थ वाढविण्याचे आव्हान पेलावे लागले. तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचे शल्य कमलनाथ यांच्या उराशी होते. यामुळे प्रामुख्याने हे मतदारसंघ शिंदे यांचा गड असल्याने शिंदे विरोधात कमलनाथ अशीच लढाई रंगली होती. आज या पोटनिवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
या पोलनुसार ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. 28 पैकी भाजपाला 16 ते 18 जागा आणि काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात ज्या आमदारांनी बंड केले त्यांना मोठा झटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे बंडखोर माजी आमदार पडल्यास त्याचा थेट फटका शिंदे यांनाही बसणार आहे. कारण समर्थक आमदार कमी झाल्याने मंत्रिपदेही त्या तुलनेत कमी मिळणार आहेत. यामुळे भाजपाच्या मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ आमदारांचे चेहरे खुलले आहेत.
काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या 25 आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी 14 जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ 8 जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला 28 पैकी 28 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे.
शिंदे साईडलाईनप्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. अखेर निवडणुकीत ‘भाजपा है तो विश्वास है’ चा नारा देण्यात येऊ लागला, हा नारा पुढे बदलून 'शिवराज है तो विश्वास है' असा झाला होता. या गोष्टींचा परिणाम पोटनिवडणुकीतच नाही तर पुढील 2023 मधील निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.