लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल व अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मागणीचे पत्र राज्यपालांना पाठविले.
राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात आ. अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आ. सेल्वम यांचा समावेश होता. केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला. राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहोचविले. कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली, तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली.
साकेत गोखलेंविरुद्ध तक्रारभाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात साकेत गोखले नामक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भाजपने ४.७५ कोटी रुपये किमतीचा रेमडेसिविरचा भाजपने केलेला साठा पोलिसांनी जप्त केल्याचा दावा गोखले यांनी ट्वीटद्वारे केला होता. ही माहिती धादांत खोटी असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.विशेष अधिवेशनाची मागणीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाविषयक उपाययोजनांची व सद्य:स्थितीची माहिती राज्याला देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली आहे.