मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलून दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला.दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या चेंबूर येथील प्रचारसभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, कारगिलप्रमाणेच पुलवामा येथील हल्लासुद्धा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. कारगिल युद्धानंतर वाजपेयींनी सर्व घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. वाजपेयींसारखी हिंमत मोदी दाखविणार का, असा सवाल करतानाच, हे सरकार शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राफेल प्रकरण हे या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास तब्बल छत्तीस हजार कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना तुरुंगात डांबणार असल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी केला.‘काँग्रेस गरिबीचे उच्चाटन करेल’२०१४च्या प्रचारात मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला वारेमाप आश्वासने दिली. पाच वर्षांनंतर आश्वासनपूर्तीचा लेखाजोखा मांडायचे सोडून, भाजपने पुन्हा एकदा आश्वासनांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. याउलट काँग्रेसचा जाहीरनामा देशातील वीस टक्के गरिबांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. इंदिरा गांधींनी केलेल्या प्रभावी कामामुळे देशातील गरिबीचा दर कमी झाला होता. आता ‘न्याय’ योजनेमुळे गरिबीचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 5:53 AM