कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनावरून शेतकरी आणि विरोधकांनी आधीच मोदी सरकारला घेरलेले असताना एनडीएच्या मित्रपक्षांमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपा शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही पक्षाने (RLP) एनडीए सोडत असल्याची घोषणा केली आहे.
आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी याचे संकेत दिले आहेत. एनडीएला शिवसेना आणि अकाली दलाने आधीच सोडले आहे. आम्हीही एनडीए सोडणार आहोत. बेनिवाल म्हणाले की, मी आज एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो. तीन कृषी कायद्यांविरोधात मी रालोआची साथ सोडली आहे. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. जरी मी रालोआ सोडले असले तरीही मी काँग्रेसला साथ देणार नाही. मोदींकडे 303 खासदार आहेत, त्यामुळेच ते कोणाला न जुमानता कृषी कायदे मागे घेत नाहीएत. 1200 किमी लांबहून राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हरियाणाच्या सीमेवरील शाहजहांपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर आम्ही एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बेनिवाल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांना घेऊन राजस्थानहून दिल्लीला जाण्यासाठी कूच करेल. तेव्हाच एनडीएमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले होते. बेनिवाल हे जाटांचे नेते आहेत. ते नागौरहून खासदार आहेत. बेनिवाल यांनी याआधीच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसदेच्या तीन समित्यांचा राजीनामा दिला आहे. शिरोमनी अकाली दलाने तीन महिन्यांपूर्वीच कृषी विधेयकांना विरोध करत एनडीएची साथ सोडली होती.
मोदी सरकारचेच आंदोलनाला फंडिंग; पंजाबच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात एकीकडे मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली सीमेवर गेल्या महिनाभरापासून उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. हे पैसे पंजाब, हरियाणाच्या आंदोलक शेतकऱ्यांनाही मिळालेले आहेत. यामुळे मोदी सरकारच शेतकरी आंदोलनाला फंडिंग करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बँक खात्यात पैसे आल्यानंतर पंजाबच्याच शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आंदोलन करण्यासाठी हा पैसा पाठविला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवते, असा सवाल भाजपाच्याच नेत्यांनी उपस्थित केला होता. यावर या शेतकऱ्यांनी केलेले हे आरोप या प्रश्नाचे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे.