शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

आपल्या जुन्या मित्रांसाठी नरेंद्र मोदी दोन अश्रू ढाळतील का?; शिवसेनेचा भाजपाला सवाल

By प्रविण मरगळे | Published: February 11, 2021 7:31 AM

Saamana Editorial: देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. लोकशाहीच्या प्रपृतीसाठी ते चांगले नाही.

ठळक मुद्देदिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकरी घुसले व लाल किल्ल्यावर पोहोचून धुडगूस घातला हे सरकारचे अपयश आहे. सध्या मात्र ‘सब घोडे बारा टके’ भावाने ऊठसूट प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे लावली जात आहेत.ज्यांच्यावर देशद्रोहाचे, खोटेपणाचे खटले चालवायला हवेत ते भाजप सरकारचे जावई म्हणून वावरत आहेत ज्यांनी कालपर्यंत भाजपच्या व मोदींच्या पखाली वाहिल्या ते एकजात देशाचे दुश्मन झाले.

मुंबई - हिंदुस्थानातील पत्रकारिता इतकी हतबल व लाचार कधीच झाली नव्हती. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आपली परंपरा आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बिरुद आहे, पण निवडणूक प्रचारात थापा मारून लोक सत्तेवर येतात. असत्याचा रोज जय होतोय, मात्र एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात मेला की अपघातात? यावर कोर्टमार्शल करून पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर लटकविले जात आहे. पंतप्रधान मोदी हे कधीकाळी पत्रकारांचे मित्र होते. पत्रकारांनीच मोदींना शिखरावर नेले. आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधानांना विचारला आहे.

तसेच प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचे ‘ट्विट’ राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, शशी थरूर व अन्य तीन पत्रकारांनी केले. त्यावर सरकारने म्हणजे दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई केली. हे सर्व लोक देशद्रोही, दंगलखोर, अफवा पसरवून गुजराण करणारे आहेत़ असे कठोर कायदे लावून त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली. त्यावर तूर्त तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, पण या मंडळींच्या डोक्यावर अटकेची व कारवाईची टांगती तलवार कायम आहे व ती तशीच ठेवली जाईल. या सर्व पत्रकारांच्या मागे देशातील पत्रकारांनी ठामपणे उभे राहायला हवे. आज हे लोक जात्यात आहेत व इतर सुपात असले तरी जे सुपात आहेत त्यांनादेखील भविष्यात भरडून किंवा चिरडून जाण्याचे भय आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. लोकशाहीच्या प्रपृतीसाठी ते चांगले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही व एखाद्याने कोणताही आगापीछा नसताना दुसऱ्यावर शेणफेक करावी, हे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही. अर्थात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुणी अतिरेक केला म्हणून त्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकविता येणार नाही.

सध्या याबाबतीत गोंधळाचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. याबाबतीत सरकार करीत असलेली कारवाई निष्पक्ष किंवा पारदर्शक नाही. त्यामुळे सरकारच्या कारवाईवर चिंता व्यक्त करावी असे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व लोक कालपर्यंत सन्माननीय पत्रकार, संपादक होते.(Shivsena Target PM Narendra modi & BJP over action against journalist Rajdeep Sardesai, Shashi Tharoor) 

मृणाल पांडे यांनी हिंदीतील प्रमुख दैनिके व मासिकांचे संपादकपद भूषविले आहे. त्यांनी वयाची सत्तरी पार केली. राजदीप सरदेसाई हे ज्येष्ठ पत्रकार व महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंचे चिरंजीव आहेत. ‘पद्म’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. शशी थरूर हे एक विख्यात लेखक, पत्रकार व विद्यमान खासदार आहेत. संयुक्त राष्ट्रांतही थरूर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. हे लोक एखाद्या प्रकरणात घाईगडबडीत चुकू शकतात, पण म्हणून त्यांच्यावर दंगलखोरीचे तसेच देशद्रोहाचे आरोप लावणे बरोबर नाही.

दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकरी घुसले व लाल किल्ल्यावर पोहोचून धुडगूस घातला हे सरकारचे अपयश आहे. पोलिसांनी अश्रुगोळे सोडले, पोलिसी बळाचा वापर केला. त्यात अफरातफरी झाली. एका शेतकऱ्याचा ट्रक्टर उलटून त्यात त्याचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली. हा मृत्यू पोलिसी गोळीबारात झाल्याची बातमी फुटताच पत्रकारांनी ‘सबसे तेज’च्या नादात ट्विट केले व फसले, पण मृत्यूचे कारण वेगळे आहे हे स्पष्ट होताच हे ‘ट्विट’ मागे घेतले. मात्र याच ट्विटमुळे जणू दंगल उसळली, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला असे ठरवून सरदेसाई, थरूर, मृणाल पांडे वगैरेंना देशद्रोहाच्या वधस्तंभावर चढविण्याची तयारी सुरू आहे.

आता या मृत शेतकऱ्याच्या शोकसभेला उत्तर प्रदेशमधील रामपूर या गावी दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी उपस्थित राहिल्या. या भयंकर अपराधाबद्दल श्रीमती प्रियंका गांधींनाही देशद्रोहाच्या खटल्यातील आरोपी करणार काय? हे जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ पत्रकार आज सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारीत आहेत, त्यांच्या अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे फटके शिवसेनेनेही खाल्लेच आहेत.

निखिल वागळे यांच्या अतिरेकी कलमबाजीबद्दल संतापलेल्या शिवसैनिकांनी वागळ्यांवर हल्ला केला असे सांगतात. त्यावेळी आज देशद्रोही ठरलेले हेच बहुतेक पत्रकार शिवसेना भवनाच्या दारात ‘मांडव’ घालून तांडव करीत होते, शिवसेनेच्या नावाने शंख करीत होते. तरीही आम्ही म्हणतो ते देशद्रोही नाहीत व त्यांचा असा छळ करणे योग्य नाही.

सध्या मात्र ‘सब घोडे बारा टके’ भावाने ऊठसूट प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे लावली जात आहेत. या गुन्हय़ासाठी भारतीय दंड संहितेत इतरही कलमे आहेत. त्यांचा विसर कायदा राबविणाऱ्यांना पडला असेल तर ते धक्कादायक आहे. सरदेसाई, थरूर, मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ, विनोद के. जोस, अनंत नाथ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हरकत नाही, पण खोटय़ा बातम्या देऊन लोकांना गुमराह करणाऱ्या किती गोदी मीडियावर आतापर्यंत अशा कठोर पद्धतीने कारवाया झाल्या आहेत?

मीडिया बडय़ा भांडवलदारांचा उद्योग झाला आहे व हे सर्व भांडवलदार राज्यकर्त्यांच्या टाचेखालीच गुदमरलेल्या अवस्थेत जगत असतात. आणीबाणीतील पत्रकारांच्या अवस्थेवर आता हसण्यात अर्थ नाही. एका बाजूला गोस्वामीसारखे टी.व्ही. पत्रकार भ्रष्ट मार्गाने ‘टीआरपी’ वाढवतात, घोटाळे करतात. राष्ट्रीय सुरक्षेस सुरुंग लावणारे काम पत्रकार म्हणून करतात. संरक्षण खात्याची गुपिते पह्डून मोकळे राहतात.

अशा लोकांवर केंद्र सरकारने ‘स्युमोटो’ देशद्रोहाची कारवाई करणे गरजेचे असताना तिकडे मात्र सगळा मामला थंडय़ा बस्त्यात गुंडाळण्यासाठी दाबदबाव टाकले जातात. त्यांच्यावरच्या विधानसभेतील हक्कभंगावरही कारवाई होऊ नये म्हणून न्यायालयास विशेष हस्तक्षेप करण्यास भाग पाडले जाते. त्याच वेळी लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी सडक्या न्यायव्यवस्थेवर प्रहार करताच त्यांनाही कारवाईच्या सुळावर चढविले जात आहे.

ज्यांच्यावर देशद्रोहाचे, खोटेपणाचे खटले चालवायला हवेत ते भाजप सरकारचे जावई म्हणून वावरत आहेत व ज्यांनी कालपर्यंत भाजपच्या व मोदींच्या पखाली वाहिल्या ते एकजात देशाचे दुश्मन झाले. हा प्रकार अजब गजब आहे, पण या सर्व तथाकथित देशद्रोही वगैरे पत्रकारांसाठी कोण अश्रू ढाळणार! सगळेच गौडबंगाल आहे, गोलमाल आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाJournalistपत्रकारFarmers Protestशेतकरी आंदोलन