जम्मू – मागील वर्षभर कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, यात राजकीय नेतेही सुटले नाहीत, श्रीमंत असो वा गरीब कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सगळ्यांनाच घरीच बसावं लागलं, यातच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी रविवारी लॉकडाऊनमधील एक किस्सा उपस्थितांना ऐकवला आणि सगळ्यांनाच हसू आवरलं नाही.
फारूक अब्दुला नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फारूक अब्दुला यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा लोकांना ऐकवला, अब्दुला म्हणाले की, जेव्हापासून कोरोना महामारी आली आहे तेव्हापासून पत्नीचं चुंबनही घेतलं नाही, अब्दुलांच्या या विधानावर उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला. त्यानंतर फारूक अब्दुला म्हणाले की, कोणीही हात मिळवणे अथवा मिठी मारण्यापासून घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
फारूक अब्दुला यांच्या विधानाची ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फारूक अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर याआधीही अशाप्रकारे विधानं केली होती. यापूर्वी २७ मार्च २०१८ रोजी फारूक अब्दुला यांच्याकडून संसद भवनात असाच प्रकार घडला होता. अब्दुला यांनी काही स्थानिक चॅनेलला प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी काही महिला पत्रकार माईक घेऊन त्यांच्याकडे पोहचली, त्यावेळी फारूक अब्दुला यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मस्करीमध्ये कोणीही मला या महिलांकडून वाचवा असं म्हणाले.