श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah ) यांनी सोमवारी डीडीसी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गुपकार आघाडीतील सर्व पक्ष जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषदेची (JKDDC) निवडणूक आपापल्या निवडणूक चिन्हावर लढवतील असं फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आम्ही देशाचे शत्रू नाही तर भाजपाचे शत्रू आहोत. महात्मा गांधीजींच्या भारतावर आमचा विश्वास आहे" असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
फारूक अब्दुल्ला यांनी "आमची गँग नाही. आमच्या पक्षांची एक राजकीय आघाडी आहे. जे लोक आम्हाला गँग म्हणत आहेत ते सर्वात मोठे दरोडेखोर आहेत. म्हणूनच ते सर्वांना गँगच्या नजरेने पाहत आहेत. आम्ही आघाडीतील पक्ष ही एकत्र निवडणूक लढवू. पण आमच्या आघाडीला निवडणूक चिन्ह मिळू शकत नाही. म्हणूनच आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर संयुक्त उमेदवार उभे करून निवडणूक लढवू" असं म्हटलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या आदेशावरून फारूक अब्दुल्ला यांच्यासह राज्यातील सर्व बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीचे प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना सोडण्यात आलं. यानंतर, कलम 370 लागू करण्यासाठी गुपकार डिक्लेरेशननुसार राज्यातील सर्व पक्ष एक झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"
"तरुणांना नोकरी मिळाली नाही तर त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही" असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी बिहारमधील निवडणुकवर देखल भाष्य केलं आहे. "मी तेजस्वी यादव यांचे अभिनंदन करू इच्छिते कारण इतके लहान असूनही त्यांनी बिहारमध्ये अन्न, वस्त्र, रोजगार, निवारा आणि कलम 370, 35 अ , जमीन खरेदी चालू दिले नाही. आज यांची वेळ आहे. उद्या आपल्या सर्वांची वेळ येईल. अमेरिकेत ट्रम्प यांच्यासोबत जे झालं तेच यांच्यासोबत देखील होणार आहे" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच कलम 370 हटवल्यानंतर भाजपा सरकारने जम्मूमधील परिस्थिती खराब केली आहे.