श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते एकामागोमाग एक राजीनामा देण्याचं सत्र सुरु आहे. मध्य काश्मीरच्या गांदरेबल जिल्ह्यात भाजपाच्या ६ सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबत काश्मीरात मागील आठवडाभरात पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते असे एकूण ४० सदस्य राजीनामा देऊन भाजपातून बाहेर पडले आहेत.
अलीकडेच काश्मीरच्या सरपंच आणि पंचायत समितीच्या सदस्यांसह पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे पक्षातील अनेक जणांवर दहशतीचं सावट आहे. मागील ८ जुलै रोजी दहशतवाद्यांनी भाजपाचे वसीम बारी, त्यांचा भाऊ उमर शेख, वडील बशीर शेख यांना बांदीपोरा येथे गोळी मारुन हत्या केली होती. बांदीपोराच्या घटनेनंतर महिनाभरात ९ ऑगस्टला दहशतवाद्यांनी ओमपारा, बडगाममधील भाजपा कार्यकर्ते हामिद जमाल नाजर यांना गोळी मारली. तर ६ ऑगस्टला दक्षिण काश्मीरच्या काजीगुंड परिसरात सरपंच सज्जाद खांडे यांची घराबाहेर हत्या केली होती.
भाजपा(BJP) नेते राम माधव यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु अनेक जणांचे म्हणणं आहे की, काश्मीरमधील प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला सुरक्षा देणे शक्य नाही. पण जे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत त्यांना सुरक्षा दिली जाऊ शकते. तसेच अन्य लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्थी केली जाईल असं त्यांना सांगितलं आहे.
काश्मीरमध्ये नेत्यांना १६ ऑगस्टपर्यंत सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत व्यवस्था केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, १५ ऑगस्टपर्यंत नेत्यांच्या जीवाला धोका आहे. पण काश्मीरमधील पंचायत समितीच्या नेत्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारची काय रणनिती आहे याबाबत मोठा प्रश्न आहे. गेल्या १८ महिन्यांपासून पंचायत आणि सरपंच यांनी वैयक्तिक सुरक्षेसाठी मागणी केली आहे पण अद्याप सुरक्षा देण्यास सरकार असमर्थ राहिलं आहे.
याबाबत जम्मू काश्मीर पंचायत समितीचे अध्यक्ष शफीक मीर यांनी सांगितले की, आम्ही गेल्या ८ वर्षापासून सुरक्षेची मागणी करत आहोत. हा मुद्दा जिल्हा बोर्डाच्या बैठकीत तत्कालीन उपराज्यपाल जीसी मुर्मू यांच्यासमोर उपस्थित केला होता. काश्मीरमधील भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रोमेसा रफीक यांनीही राज्य महासचिव अशोक कौल यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्यावर कौल म्हणाले होते, याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे माहिती दिली आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी मागणी केली आहे. पण पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं आहे की, ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे ते केवळ सदस्य आहेत. तर नॅशनक कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मौन बाळगलं आहे, त्यांनी त्यांचे कार्यालय सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आम्हाला निशाणा बनवलं जात आहे असा आरोप रफीक यांनी केला.
याबाबत भाजपाचे मीडिया प्रभारी मंजूर भट्ट म्हणाले की, या राजीनाम्याचा भाजपावर काहीही परिणाम होणार नाही. पण पक्षाने कार्यकर्त्यांवरील हल्ले गंभीरतेने घेतले आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची तयारी सुरु आहे. त्याचसोबत हत्या रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसारखं मुख्यालय बनवलं जावं, त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्य कुटुंबीयांना सुरक्षित वाटू शकेल असं पक्षाला कळवलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या
जगातील पहिली कोरोना लस बनवली; रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची घोषणा
पोलीस उपनिरीक्षकानं लॉकडाऊनमध्ये लग्न केलं अन् होम क्वारंटाईनमध्ये स्वत:वर गोळी झाडली
१ सप्टेंबरपासून शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर; कोरोनाच्या धास्तीनं ऑनलाईन शिक्षणावरच भर
सीबीआय चौकशी करायची असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांचीही करा; शिवसेनेची मागणी