पटणा – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने चर्चेत आलेल्या बिहारच्या माजी डीजीपींनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. माजी पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांनी संध्याकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत त्यांनी जनता दला(युनायटेड) या सत्ताधारी पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुप्तेश्वर पांडे राजकारणात पदार्पण करणार असल्याची चर्चा होती.
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. ते एनडीएचे उमेदवार म्हणून राजकीय मैदानात आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे. याआधी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांकडून पटनामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्या आदेशानंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी या पथकातील आयपीएस विनय तिवारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता. तसेच सुशांत प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करावे यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केले.
कोण आहेत गुप्तेश्वर पांडे?
गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ २८ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. याआधी २००९ मध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यावेळी बक्सर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. बक्सरचे भाजपा खासदार लालमुनी चौबे यांना पक्ष पुन्हा तिकीट देणार नाही, अशी आशा गुप्तेश्वर पांडे यांना होती. मात्र, भाजपाने लालमुनी चौबे यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे राजीनामा दिलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी पुन्हा पोलीस सेवेत येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर साधला निशाणा
बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते असा टोला त्यांनी लगावला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...
“नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”
...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका
फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक
‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू