मुंबई – मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात मराठा आरक्षण चिघळत असताना पोलीस भरती करणं योग्य नाही,आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी काही जण मी ब्राह्मण असल्याने माझ्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत असा आरोप केला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेनेने भाष्य केले आहे. महाराष्ट्र कधीही जातपात धर्म पाहत नाही, महाराष्ट्राने मुस्लीम मुख्यमंत्री दिलेला आहे, अल्पसंख्याक मंत्री दिले आहेत. पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता. त्यामुळे असा आरोप करणं चुकीचा आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारलं आहे.
तर अकाली दल एनडीएतून बाहेर पडला असं म्हणता येत नाही, एका विधेयकावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली. एनडीएत संवाद थांबला आहे असं वाटतं, संवाद राहिला असता तर शिवसेनेला बाहेर पडावा लागलं नसतं, पण हा इतिहास झाला, एनडीए अस्तित्वात आहे असं दिसत नाही, अकाली दल आणि शिवसेना एनडीएचा मुख्य घटक होते असं सांगत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस विरोधी पक्षाने बेरोजगार दिन साजरा करणे योग्य नाही, बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहे त्याचा स्फोट एका दिवसात होत नाही असं सांगत काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
माझी जात ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षणाचा विषय माझ्यावर टाकला की संशय निर्माण करता येतो असे काही जणांना वाटते, तथापि, मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे. माझ्याबाबत असा संशय निर्माण करणाऱ्यांना कधीही यश येणार नाही, आरक्षणाच्या प्रकरणात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडू नये, असे मी सांगितल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. स्वत: कुंभकोणी यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता तर महाविकास आघाडीचे सरकार आहे तरीही कुंभकोणी नव्हे तर माजी महाधिवक्ता थोरात यांच्या नेतृत्वातील टीम बाजू मांडत आहे, मी कुंभकोणी यांना तसे सांगण्याचा प्रश्न येतो कुठे? थोरात यांच्या टीमनेच उच्च न्यायालयात केस जिंकलेली होती, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा
संसेदतल्या प्रस्तावित कृषी विधेयकांवरून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या. प्रस्तावित कृषी विधेयकांना शिरोमणी अकाली दल विरोध करणार असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेतल्या भाषणात म्हटलं होतं. 'तीन कृषी विधेयकांचा थेट परिणाम पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. ३० हजार अडते, कृषी बाजारपेठेतील ३ लाख मजुरांना विधेयकामुळे फटका बसणार आहे,' असं बादल म्हणाले होते. तेव्हाच अकाली दल सरकारमधून बाहेर पडणार हे स्पष्ट झालं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ
भाजपाला आणखी एक धक्का?; शिरोमणी अकाली दलानंतर जेजेपीवर साथ सोडण्याचा दबाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलं देशवासियांना बर्थ डे गिफ्ट; ट्विटरवरुन शेअर केली विश लिस्ट