नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस आणि इतर विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात अडकला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी आली आहे. मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद कमकुवत झाली आहे" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचा संदर्भही राहुल यांनी दिला आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे 23.9 टक्क्यांनी खाली आला होता. याआधी राहुल गांधी यांनी नोटाबंदी, लॉकडाऊन आणि सरकारच्या आर्थिक निर्णयांवर हल्लाबोल केला आहे.
काही दिवसांपूर्वी "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं म्हणत मोदींना टोला लगावला होता. "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांनी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी राहुल यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं होतं.