नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आलंय की ज्यांना देशाच्या अन्नदात्याचं दु:ख कळत नाही", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे.
देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. शेतकरी आंदोलक केंद्राच्या जाचक कायद्यांसमोर अजिबात झुकणार नाहीत, असं सोनिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
"अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने गर्विष्ठपणा सोडून तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीविना रद्द करावेत आणि कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हाच खरा राजधर्म ठरेल आणि ज्या शेतकऱ्यांनी यासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल", असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.
लोकशाही म्हणजे देशातील नागरिकांच्या भावनांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करणे असा होतो, हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं असा खोचक सल्ला देखील सोनिया यांनी यावेळी दिला.
मोदी सरकार भावनाशून्यकृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर अजूनही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यावरुनही सोनिया यांनी मोदींवर टीका केली.
"भाजप सरकार असो वा पंतप्रधान मोदी हे भावनाशून्य असून आतापर्यंत शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. त्यावर चकार शब्द देखील यांनी काढला नाही. शेतकरी आंदोलनात प्राण गमवावा लागलेल्या सर्व शेतकरी बांधवांना मी आदरांजली वाहते आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती लाभो अशी प्रार्थना करते", असं सोनिया म्हणाल्या.