मुंबई – राज्यभरात गेल्या आठवड्यात पूरानं थैमान घातलं होतं. कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पूरग्रस्त भागात बरेच नुकसान झाले. पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी कोकणातील चिपळूण, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरचा दौरा केला होता.(Flood Affected Area Sangli)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत मुख्यमंत्री खुर्चीतून उभे राहून हात जोडल्याचं पाहायला मिळत आहे. हे हात मुख्यमंत्र्यांनी कोणाला जोडले आहेत? मुख्यमंत्री खुर्चीतून का उठले? याबद्दल अनेकांना माहिती नाही. मात्र या फोटोमागची कहाणी आता समोर आली आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा करुन मुख्यमंत्री सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेव्हा एक व्यक्ती याठिकाणी निवेदन देण्यासाठी आली होती. ही व्यक्ती विश्वनाथ मिरजकर.
विश्ननाथ मिरजकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही पहिली भेट होती. मिरजकर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. तेव्हा राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वनाथ मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षण चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. त्यावेळी आपल्यासमोर एक ज्येष्ठ शिक्षक उभे आहेत लक्षात येताच मुख्यमंत्री तात्काळ खुर्चीवरून उठले आणि विनम्रपणे हात जोडून त्यांचे प्रश्न समजून घेतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच भेटीत दिलेल्या वागणुकीनं विश्वनाथ मिरजकर भारावले. मिरजकर म्हणाले की, अनेकदा आम्ही जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनं दिली. त्यांनी ती खुर्चीत बसूनच स्वीकारली. आम्ही उभे असायचो, फोटो काढायचो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कृतीनं आम्हाला सुखद धक्काच बसला. मुख्यमंत्री उठून उभे राहिले. त्यांनी निवेदन हाती घेतले. त्यांच्या अशा वागण्यानं गुरुजणांप्रतीची ही विनम्रता मनाला स्पर्श करून गेली असं त्यांनी सांगितले.
इतकचं नाही तर राजकीय नेत्यांनी सामान्य माणसाला भरभरून पैसे, निधी मदतच द्यायला हवी असे नाही. थोडासा सन्मान दिला तरी माणूस भारावून जातो. मुख्यमंत्र्यांसोबत ही पहिली भेट दीर्घकाळ स्मरणात राहील. मिरजकर यांच्यासोबत अनेक शिक्षक उपस्थित होते. त्यांनी हा फोटो काढला आणि एकमेकांना शेअर केला. शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत. कुठलीही समस्या १०० टक्के निकाली लागत नाही. परंतु त्याविषयाबद्दल किती आत्मीयता दाखवता हा मुद्दा असतो असंही मिरजकर म्हणाले.