'तो' निर्णय चूकच होता, पण पश्चाताप नाही; पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:36 PM2021-06-04T19:36:22+5:302021-06-04T19:38:42+5:30
Devendra Fadnavis : पुरेसं संख्याबळ नसल्यानं चार दिवसांत पडलं होतं सरकार. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं, फडणवीस यांचं वक्तव्य.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहाटेचा शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. दरम्यान, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा चुकीचा निर्ण होताय राष्ट्रवादी काँग्रेससोहच सरकार स्थापन करायला नको होतं. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एका वेबिनारमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
योग आणि इश्वरावर विश्वास
"उद्धव ठाकरे यांनी पहिली मुलाखत देताना आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नरेंद्र मोदी हे राजकारणात फारसे उतरत नसले तरी अमित शाह हे त्यांच्या २४*७ चर्चेत होते. योग आणि इश्वरावर माझा विश्वास आहे. कधी योग असाही असतो की आपण खुप प्रयत्न करतो. परंतु फासे नीट पडले नाहीत आणि सरकार गेलं," असं त्यांनी नमूद केलं. माझं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं जेवढं चुकीचं होतं तेवढंच हे सरकारही अनैतिक असल्याचं ते म्हणाले.