...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:18 IST2021-07-09T17:15:59+5:302021-07-09T17:18:25+5:30
Devendra Fadnavis On Kripashankar Singh : काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला होता प्रवेश.

...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करत प्रक्ष प्रवेशाचं महत्त्वाचं कारण सांगितलं.
"संपूर्ण देशात कलम ३७० वर काँग्रेस सोडणारे सर्वात पहिले नेते कृपाशंकर सिंह हे होते. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना २० महिन्यांनी पक्षात प्रवेश दिला. कोणी मतपरिवर्तन करून आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्यांना घेतोच. एखाद्या पक्षातून आमच्या पक्षात आला किंवा आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तर कधीतरी दुसऱ्या पक्षाबद्दल वाईट बोललाच असतो. परंतु आमच्या पक्षात आल्यावरच या चर्चा होतात," असं फडणवीस म्हणाले.
यापूर्वी काय म्हणाले होते फडणवीस?
"कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं होतं. परंतु ज्यावेळी काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान अंतिम उपाय चाचपडत असल्याचं त्यांना समजलं आणि काँग्रेसचा विरोध असल्याचं कळलं, तेव्हा मोदींना त्यांनी पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागा झाला होता. जर काँग्रेसनं समर्थन केलं नाही, तर आपण पक्षातून बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिला होता," असं फडणवीस कृपाशंकर सिंह यांच्या पक्षप्रवेशादरम्यान म्हणाले होते.
"जेव्हा ते पक्षातून बाहेर पडले तेव्हा ते लगेच भाजपत सामील झाले नाहीत. त्यांनी २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि दोन वर्षांनी ते भाजपत सामील झाले. त्यांच्या हा प्रवेश एका पक्षातून दुसऱ्या पक्षातला नसून त्यांनी एक विचारधारा सोडत दुसऱ्या विचारधारेचा स्वीकार केला आहे," असंही त्यांनी नमूद केलं होतं.