महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा विरोध केला होता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांचं स्वागत करत त्यांचा प्रवेश हा पक्षातील नसून एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झालेला प्रवेश असल्याचं म्हटलं.
"कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं होतं. परंतु ज्यावेळी काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान अंतिम उपाय चाचपडत असल्याचं त्यांना समजलं आणि काँग्रेसचा विरोध असल्याचं कळलं, तेव्हा मोदींना त्यांनी पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागा झाला होता. जर काँग्रेसनं समर्थन केलं नाही, तर आपण पक्षातून बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिला होता," असं फडणवीस यावेळी म्हणाले.
काँग्रेसचा आरोपकृपाशंकर सिंग यांच्या भाजपत सामील होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनं त्यांच्यावर आरोप करत निवडणुका जिंकण्याच्या गरजेसाठी ते भाजप किंवा शिवसेनेत जाऊ इच्छित असल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या संपर्कात होते. तसंच ते फडणवीस यांच्याही संपर्कात होते, असं म्हटलं जात आहे.