नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे काँग्रेसचे केरळमधील मोठे नेते पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. (Former Congress leader PC Chacko joins Nationalist Congress Party, in the presence of party chief Sharad Pawar)
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात, असे म्हटले होते. चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देताना चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे मी समाधानी आणि आनंदी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.