मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्तर भारतीय समाजाचे नेते म्हणून कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत दबदबा ठेवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.
मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेत कृपाशंकर सिंह यांनी केंद्र सरकारचं कौतुक केले होते. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कृपाशंकर सिंह यांनी १० सप्टेंबर २०१९ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून कृपाशंकर सिंह भाजपात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.
कोण आहेत कृपाशंकर सिंह?
मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ३ वेळा आमदार झालेले कृपाशंकर सिंह हे विलासराव देशमुख सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री पदी होते. त्याआधी विधान परिषदेचे सदस्य होते.
मुंबई महापालिकेत भाजपाला फायदा
मुंबईत जवळपास २५ लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. भाजपाकडे उत्तर भारतीय चेहरा नसल्याने कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशानं भाजपाला बळ मिळणार आहे. मुंबईत महापालिकेत गेल्या ३० वर्षापासून असणारी शिवसेनेची सत्ता पालटण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे. त्यात कृपाशंकर सिंह यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने उत्तर भारतीय मते वळवण्यासाठी त्यांचा फायदा भाजपाला होऊ शकतो.