नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी शनिवारी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केलं मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमावला असं म्हटलं आहे. काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे.
भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्या सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सिद्धरामय्या यांनी देखील कुमारस्वामींवर पलटवार केला आहे. "कुमारस्वामी 'खोटं बोलण्यात' माहिर आहेत आणि भावुक होऊन अश्रू वाहणं ही त्यांची जुनी सवय असल्याची जोरदार टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर दुसरीकडे कुमारस्वामी यांनी देखील निशाणा साधला आहे.
"काँग्रेससोबत युती करून चूक केली, जनतेच्या विश्वासाला तडा गेला"
"2006-07 मध्ये मी निवडणूक जिंकून जनतेचा विश्वास मोठ्या कष्टाने मिळवला होता. 12 वर्षे हा विश्वास जनतेने माझ्यावर दाखवला. पण मी काँग्रेससोबत युती केल्यानंतर जनतेच्या या विश्वासाला तडा गेला" असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वीमी यावेळी म्हणाले. पक्षश्रेष्ठीमुळे युती सरकार स्थापनेवर सहमती दर्शविली होती.
"कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात"
2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा एकमेकांविरूद्ध लढलेल्या काँग्रेस-जेडी (एस) ने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी खोटं बोलण्यात पटाईत आहेत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटं बोलू शकतात. जेडीएसला केवळ 37 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.