“भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला”; माजी आमदारानं हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ
By प्रविण मरगळे | Published: December 16, 2020 03:00 PM2020-12-16T15:00:11+5:302020-12-16T15:02:31+5:30
राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले
मुंबई - जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करु. राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे आता नाहीत त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे. भाजपाने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला आहे.
जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही, राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करतोय. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असं अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.
देशासमोर शेतकर्यांचा प्रश्न आवासून उभा आहे. केंद्राकडून प्रश्न सोडवले जात नाहीय. मात्र आम्ही सर्व घटकांना न्याय देणारे आहोत. इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे. पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला आहे त्यात अधिक भर घालण्याचे काम करु. मातंग समाजाच्या साथीने आपण पक्ष वाढवूया असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोल्हापूर जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील बर्याच प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. तर आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा उतराई होण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय दुसरं काम करणार नाही असं स्पष्ट करतानाच २०२१ मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडणार नाही. राष्ट्रवादीशिवाय आपल्याला यापुढे पर्याय राहणार नाही असंही राजीव आवळे यांनी स्पष्ट केले.