"भाजप सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू"; अजित पवारांनी सांगितलं गणित
By मोरेश्वर येरम | Published: December 16, 2020 05:15 PM2020-12-16T17:15:02+5:302020-12-16T17:16:55+5:30
हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'घरवापसी'ची साद घातली आहे. "पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू", असं गणित मांडून अजित पवार यांनी भाजपच्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
"ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आता राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जे कुणी राजीनामा देऊन महाविकास आघाडीत प्रवेश करतील त्यांच्याविरोधात भाजप सहाजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करु", असं अजित पवार म्हणाले. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजूनही अनेक जण तिकडे गेले. पण आता त्यांनाही आघाडी सोडून का गेलो? असं वाटायला लागलंय, अशी सद्यस्थिती असल्याचंही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'मोठी भरती'
"विविध पक्ष, प्रांत आणि समाजातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीवेळी अनेक आश्वासनं आणि प्रलोभनं देऊन त्यांना पक्षात घेतलं होतं. पण आता येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील", असं अजित पवार म्हणाले.
आज, जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. यावेळी, माझ्यासह जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil, ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/aOh0ahKPqg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 16, 2020