मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थिर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजपा करीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, पुढील कार्यकालही पूर्ण करेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं, त्यावरून माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
याबाबत निलेश राणेंनी ट्विट करुन म्हटलंय की, अजितदादा पवार भाजपावर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता. मानलं पाहिजे अजितदादांना दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुद्धा 'मी नाही त्यातला' दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले. एकदा अजितदादांना विचारा की, ते राजभवनात त्या सकाळी का आले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजितदादांचे दुखणं काय हे मला चांगलं माहिती
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवारांचे दुखणे मला माहिती आहे.' असे म्हणत कोपरखळी हाणली.तसेच त्यावर मला काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
काय म्हणाले होते अजित पवार?
आम्हीही विरोधात होतो, आम्हालाही वाटायचं आपण सरकारमध्ये जावं, लोकांची कामं करावी. त्यावेळी जे सरकारमध्ये होते, ते आता विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना वाटणारच हे सरकार जावं आणि आपल्याला संधी मिळावी. या राजकीय गोष्टी चालत असतात, सत्तेवर कोणीही असले तरी विरोधी पक्षाला मात्र सरकार पडणार, असे म्हणावेच लागते. १९९५ मध्ये आमचे ८० आमदार होते. आम्ही विरोधात होतो. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरावे लागते. तेच आता भाजपा करते आहे. विरोधकांना कार्यकर्ते सोबत ठेवायचे असतात. त्यासाठी सरकार पडणार असे म्हणावेच लागते. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे.‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थिर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजपा करीत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं होतं.