नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले खासदार बाबुल सुप्रियो(Babul Supriyo) यांनी पक्षाला रामराम करून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. काहीच दिवसांपूर्वीच बाबुल सुप्रियो यांनी भाजपाचा राजीनामा दिला होता. टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं आहे.
बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले आहेत. त्यात म्हटलंय की, टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीत प्रवेश झाला आहे. सुप्रियो यांचे तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात येते. जुलै महिन्यात माजी केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपातील बडे नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचं जाहीर केले होते. राजकारणात केवळ समाजसेवेसाठी आलो होतो आणि मार्ग बदलत आहे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती.
तसेच मी नेहमी भाजपाचा भाग आहे आणि यापुढील राहील असं बाबुल सुप्रियो म्हणाले होते. मी तृणमूलमध्ये सहभागी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता बाबुल सुप्रिया यांनी पोस्ट अपडेट करत ती लाईन हटवली आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात बाबुल सुप्रियो यांनी टीएमसीचा झेंडा हाती घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
काय म्हणाले होते बाबुल सुप्रियो?
लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंतु मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र, राजीनामा न देता खासदारकी कायम ठेवण्याच्या निर्णयावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे, बाबुल सुप्रियो हे राजकारणात नसतील पण खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करतील असं सांगितलं होतं. बाबुल हे पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार बनून निवडून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपामध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होती. बाबुल काहीतरी मोठा निर्णय घेतील असे बोलले जात होते. त्यावर बाबुल सुप्रियो यांनी त्यांची भूमिका मांडली होती. पक्षासोबत माझे काही मतभेद होते. निवडणुकीच्या आधीच ते साऱ्यांसमोर आले होते. पराभवाची मी जबाबदारी घेतो, परंतू त्यासाठी बाकीचे नेतेदेखील जबाबदार आहेत असे सुप्रियो म्हणाले होते.
खासदारकीचे तिकीट कसे मिळालेले...
सुप्रियो यांनी आपल्या एका पोस्टमध्ये बाबा रामदेव (Ramdev Baba) यांचे नाव घेतले होते. बाबा रामदेव आणि मी एकाच विमानात होतो. तेव्हा त्यांच्याशी काही वेळ बोलणे झाले. त्यांच्या बोलण्यातून भाजपा यावेळी बंगालला गंभीरतेने घेणार आहे, असे समजले. परंतू तेवढ्या सीट येणार नाहीत. यावेळी रामदेव बाबांनी भाजपाकडे मला उमेदवार करण्यासाठी शब्द टाकला असा किस्सा त्यांनी सांगितला होता.