पणजी - भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाचे तत्त्वज्ञान आणि शिस्त पक्षाच्या सर्व मंत्री, आमदारांना कळावी व त्याविषयीचा संस्कार त्यांच्यावर व्हावा या हेतूने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला चौघे आमदार अनुपस्थित राहिले. मात्र भारतीय जनता पक्षाचे सदस्य नसलेले अपक्ष मंत्री गोविंद गावडे यांनी मात्र भाजपच्या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. चौघा आमदारांपैकी दोघेजण आजाराच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत तर मंत्री मायकल लोबो हे विदेशात असल्याने पोहचले नाहीत. भाजपकडून दरवर्षी आमदारांसाठी प्रशिक्षण सोहळे आयोजित केले जातात. यावेळी पणजीतील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम आहे. हे शिबिर निवासी स्वरुपाचे आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवसीय शिबिर आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांमधील अनेक तज्ज्ञ त्यावेळी आमदार व मंत्र्यांना मार्गदर्शन करतील. शुक्रवारी अनेक आमदारांनी रात्रीच्यावेळी तारांकित हॉटेलमध्येच निवास केला. पणजीत पाण्याची तीव्र टंचाई आहे व घरोघर नळ कोरडे पडले आहेत. मात्र, हॉटेलमध्ये राहिलेल्या आमदारांना पाण्याची झळ बसली नाही. त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही.वास्कोचे आमदार कालरुस आल्मेदा व कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर हे शिबिरात सहभागी होऊ शकले नाही. मंत्री लोबो हे विदेशात असल्याने आले नाही पण पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे का सहभागी होऊ शकले नाही ते कळाले नाही. मोन्सेरात यांचा एक कार्यक्रम अगोदरच ठरला होता, असा दावा भाजपच्या एका पदाधिका:याने केला. मात्र मोन्सेरात यांना अशा शिबिरांमध्ये कधीच रस नसतो, असे मोन्सेरात यांच्या दोघा खास कार्यकत्र्यानी लोकमतला सांगितले.भाजपच्या शिबिरांमध्ये यापूर्वी कधीच अपक्ष आमदार सहभागी होत नसत. मात्र प्रियोळचे आमदार असलेले कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी सहभागी व्हावे अशी विनंती भाजपने केली व गावडे यांनी ती मान्य केली. दरम्यान, गावडे यांनी पत्रकारांना सांगितले, की आपला पाठींबा भाजपला आहे. आपण भाजप सरकारचा भाग आहे व सरकारचे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण कटीबद्ध आहे. आपण कुठेही जे चांगले असते, ते शिकून घेतो. आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना शिबिरातून काही तरी चांगले आत्मसात करावे व शिकावे याच हेतूने शिबिरात सहभागी झालो.
भाजपच्या प्रशिक्षणास चौघे आमदार अनुपस्थित पण अपक्षाचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 8:24 PM
हॉटेलमध्ये राहिलेल्या आमदारांना पाण्याची झळ बसली नाही.
ठळक मुद्देचौघा आमदारांपैकी दोघेजण आजाराच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत तर मंत्री मायकल लोबो हे विदेशात असल्याने पोहचले नाहीत. आपण भाजपच्या शिबिरातून काही तरी चांगले आत्मसात करावे व शिकावे याच हेतूने शिबिरात सहभागी झालो. प्रियोळचे आमदार असलेले कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी सहभागी व्हावे अशी विनंती भाजपने केली व गावडे यांनी ती मान्य केली.