- मनोज ताजनेगडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात पसरलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या लांबलचक अशा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाची निवडणूक तयारी सुरू झाली आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याशिवाय दुसरा तगडा प्रतिस्पर्धी कुणी नसल्यामुळे नेतेंची उमेदवारी जवळपास पक्की समजली जात आहे. तर काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, याची मात्र सर्वांना उत्सुकता आहे. चार प्रबळ दावेदार आपापल्या परीने उमेदवारीसाठी जोर लावत असल्याने चढाओढ निर्माण झाली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. यावेळी मोदी लाटेचा प्रभाव फारसा जाणवणार नाही या आशेने काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. १० इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी माजी आमदार आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच काँग्रेस नेते आ.विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ.नितीन कोडवते आणि माजी खासदार मारोतराव कोवासे या चार उमेदवारांमध्येच तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. डॉ. उसेंडी गेल्यावेळी पराभूत झाल्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, असा इतरांचा आग्रह आहे. युवा नेते म्हणून गेल्या ७-८ महिन्यांपासून जनसंपर्क वाढविलेले डॉ.नितीन कोडवते यांची मदार वडेट्टीवारांवर आहे. कोडवते यांच्यासाठी वडेट्टीवार आपले वजन वापरतील असे बोलले जाते. परंतु जिल्ह्याच्या राजकारणात सर्वश्रृत असलेल्या वडेट्टीवार आणि कोवासे-उसेंडी या दोन गटातील गटबाजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून सर्वांशी जुळवून घेणारे डॉ.किरसान यांचेही नाव तिसरा पर्याय म्हणून समोर येऊ शकते. ते देखील तयारीला लागले आहेत. सिरोंचा ते सालेकसा अशा जनसंपर्क यात्रेची तयारी करून त्यांनी ‘अभी नही तो कभी नही’ असे ठरवत लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार ठरवताना पक्षश्रेष्ठींचीच कसोटी लागणार आहे.काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास हा मतदार संघ काँग्रेसच्या कोट्यात जाईल. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार निवडीच्या बाबतीत निश्चिंत आहे. मात्र भाजप-शिवसेनेत युती न झाल्यास सेनेकडे सक्षम असा सर्वपरिचित उमेदवार सध्यातरी नाही. त्यामुळे शिवसेनेचे खरे लक्ष्य विधानसभेवरच राहणार आहे.भाजपाची उमेदवारी विद्यमान खासदार अशोक नेते यांना निश्चित असली तरी विद्यमान राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्याही नावांची चर्चा आहे. परंतु गेल्या लोकसभेच्या तुलनेत यावेळी जास्त आव्हानात्मक स्थिती असल्याने एवढा मोठा मतदार संघ ऐनवेळी पिंजून काढणारा नवीन उमेदवार देण्याची रिस्क भाजप घेणार नाही.आदिवासीबहुल मतदारसंघातील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक आदिवासी वनपट्टयांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून अनेक गावं आजही कोसो दूर आहेत.गडचिरोली-चिमूरएकूण मतदार - 15,43,368पुरुष- 7,83,398महिला- 7,59,970सध्याची परिस्थितीअनेक वर्षांपासून रखडलेला वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग वनकायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे. तसेच दुर्गम भागातील रस्ते, पूल हे मुद्दे प्रभावी ठरतील.भाजपच्या तुलनेत काँग्रेसमध्ये असलेली उघड गटबाजी दूर करून एकदिलाने सर्वांना कामाला लावण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांपुढे राहणार आहे.जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण १९ वरून ६ टक्के झाले, ते पुन्हा १९ टक्क्यांवर नेण्याचा मुद्दा भाजपसह काँग्रेस पक्षासाठीही अडचणीचा ठरणार आहे.लोकसभा मतदार संघातील सहापैकी पाच आमदार, पाच पैकी तीन नगर परिषद, अनेक जिल्हा परिषद मतदार संघ आणि नगर पंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. ही पकड लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेअशोक नेते (भाजप)- 5,35,982डॉ.नामदेव उसेंडी (काँग्रेस)- 2,99,112रामराव नन्नावरे (बसपा)- 66,906रमेशकुमार गजबे (आम आदमी पार्टी)- 45,458
गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस पक्षात तिकिटासाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:10 AM