मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गुरुवारी हाथरसला रवाना झाले होते. मात्र यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. यावरून विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
"हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
"त्यांना इतिहास माफ करणार नाही"
"राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल" असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की, रस्त्यावर पडले; आंदोलनाला बसले
राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच "पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?, आमची गाडी थांबवण्यात आली म्हणूनच चालत निघालो होतो" असं देखील म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.
"बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा"
बलरामपूरमध्ये ही एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "उत्तर प्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू आहे. जिवंत असताना कधी त्यांना सन्मान दिला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा आहे" असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच Balrampur Horror असा हॅशटॅग देखील वापरला आहे.