मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत असणार आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्या नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं, असा सल्ला आठवलेंनी सिब्बल आणि आझाद यांना दिला. गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीआधी काँग्रेसच्या देशातल्या २३ मोठ्या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिलं होतं. त्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्या २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश होता. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल यांनी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मोठा वादंग माजला होता.
सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 9:05 AM