नवी दिल्ली : भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहचीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी जर तुमच्या तक्रारी ऐकल्या नाहीत तर त्यांना बांबूच्या काठीने फटके द्या, असे विधान गिरीराज सिंह यांनी आपल्या बेगूसराय मतदारसंघातील लोकांना संबोधित करताना केले आहे. शनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील खोदवांपूरमधील एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना 'बांबूच्या काठीने मारण्याचा' सल्ला दिला.
सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा नेहमी तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात, असे गिरीराज सिंह सांगितले. तसेच, ते म्हणाले, "मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे कशाला येता... खासदार, आमदार, गावचे प्रमुख, डीएम, एसडीएम, बीडीओ… या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा. तसेच, जर असेही करूनही तुमचे काम होत नसेल तर मी तुमच्यासोबत आहे."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या हम दो हमारे दो वक्तव्याबद्दल टीका केली होती, ते म्हणाले होते की, "राहुल गांधींनी या घोषणेचा संदर्भ स्वत:साठी दिला होता. ते स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही", यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले होते.
आरजेडीचा हल्लाबोलगिरीराज सिंह यांच्या विधानावरून आरजेडीने बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार चालू आहे की महाजंगलराज चालू आहे?, असा सवाल आरजेडीने उपस्थित केला आहे.