जळगावः अमळनेर येथील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली, त्याच वेळी गिरीश महाजनांना धक्काबुक्की झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यामागे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा गट असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहे.उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. डॉ. बी. एस. पाटलांनी बऱ्याचदा भाजपाच्या वरिष्ठांकडे उदय वाघ यांची तक्रार केली आहे. त्यातच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर उदय वाघ यांचा गट वरचढ ठरेल, या भीतीनं डॉ. बी. एस. पाटील यांनी मोर्चेबांधणी करत ऐन वेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट केला होता. तसेच डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचाही उदय वाघ यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना स्टेजवर घेऊ नका, असा उदय वाघ गटाचा आग्रह होता. परंतु तो डावलत गिरीश महाजनांनी त्यांना मंचावर बोलावले आणि उदय वाघ यांनी त्यांना मारहाण केली. अमळनेर येथे भाजपाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांची जाहीर प्रचार सभा प्रताप मिल परिसरात बुधवारी सायंकाळी झाली.
काय आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे चित्र?जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ए. टी. पाटील आहेत. त्यांचे तिकीट कापून भाजपाने सुरुवातीला आमदार स्मिता वाघ यांना तिकिट दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचेही तिकिट कापण्यात आले. आता या मतदार संघातून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील हे भाजपाकडून उमेदवारी करीत आहेत.
काय आहे नाराजी नाट्य ?भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकिट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. झालेला प्रकार हा गंभीर आहे. ज्याने हा प्रकार घडवून आणला असेल त्यांना सोडणार नाही. कारवाई ही निश्चित केली जाईल. डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण करीत असताना आपण कार्यकर्त्यांना सोडवित होतो. आपल्याला कोणतीही धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र.