50 कोटी द्या, मोदींना ठार करतो; तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:30 AM2019-05-07T08:30:55+5:302019-05-07T08:33:40+5:30

व्हिडीओवरुन भाजपाची तेजबहादूर यादव, समाजवादी पार्टीवर सडकून टीका

Give me Rs 50 crore will kill Modi says Tej Bahadur Yadav in a sensational video | 50 कोटी द्या, मोदींना ठार करतो; तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओनं खळबळ

50 कोटी द्या, मोदींना ठार करतो; तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओनं खळबळ

Next

नवी दिल्ली: बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मला 50 कोटी द्या. मोदींना ठार करतो, असं तेजबहादूर यादव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ म्हणजे माझ्या विरोधात रचण्यात आलेला कट असल्याचं तेजबहादूर यादव यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'नं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. 

तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत आपणच असल्याचं यादव यांनी मान्य केलं आहे. मात्र हे आपल्या विरोधात रचण्यात आलेलं कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला. यावरुन भाजपानं तेजबहादूर यांच्यावर सडकून टीका केली. 'समाजवादी पार्टीनं उमेदवारी दिलेल्या तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ पाहून आम्हाला धक्का बसला. सपानं त्यांना वाराणसीतून उमेदवारी दिली. मात्र काही कारणांमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आता ते 50 कोटींसाठी मोदींच्या हत्येचा कट रचताना टीव्हीवर दिसत आहेत,' अशा शब्दांत भाजपाचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओवरुन भाजपानं काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. 'काँग्रेससारखा पक्ष सरकारच्या मागे उभा राहण्याऐवजी अशा समाजविरोधी घटकांच्या पाठिशी उभा राहतो. पंतप्रधानांच्या हत्येची भाषा करणाऱ्या व्यक्तीला समाजवादी पार्टीकडून उमेदवारी दिली जाते. हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सर्व यंत्रणांनी मोदींना असलेल्या धोक्याची दखल घ्यावी,' असं नरसिंह राव पुढे म्हणाले. मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं 1 मे रोजी बाद ठरवला. बीएसएफनं केलेल्या कारवाईची माहिती न दिल्यानं यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. भ्रष्टाचार किंवा निष्ठेवर शंका उपस्थित करुन बीएसएफमधून निलंबन न झाल्याची कागदपत्रं जमा न केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. 
 

Web Title: Give me Rs 50 crore will kill Modi says Tej Bahadur Yadav in a sensational video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.