मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) हे नेहमी माध्यमांसमोर येत विरोधकांची पळता भुई थोडी करतात. शिवसेनेसोबतच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनंही बेधकपणे बोलतात. असाच एक दावा संजय राऊतांनीकाँग्रेसबद्दल(Congress) केला आणि ते तोंडावर आपटले. शिवसेनेसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसनं संजय राऊतांच्याच दाव्यातली हवा कशी काढली? काँग्रेसनं हे मुद्दाम केलंय का, संजय राऊत नेमकं काय बोलले हे जाणून घेऊया.
गोवा विधानसभा निवडणुकीचं(Goa Assembly Election 2022) बिगुल वाजलंय. गोवा जिंकण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि भाजपासह आपनंही कंबर कसलीय. दुसऱ्या बाजूला गोव्यात युती - आघाडीच्या राजकाणानंही वेग घेतलाय. त्यातच संजय राऊत यांनी गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, काँग्रेसनं आमच्योसोबत यावं, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आमच्यासोबत येईलच असा दावा केला पण काँग्रेसनं फक्त २४ तासात राऊतांच्या बोलण्यातली हवा काढली. काँग्रेसनं एकामागोमाग एक अशा दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आणि राऊतांचा प्रस्ताव उघडपणे फेटाळला.
काँग्रेसने रविवारी त्यांची विधानसभा उमेदवारांची ७ नावांची दुसरी यादी जाहिर केली. त्यापुर्वी काँग्रेसने पहिल्या यादीत ८ जागांवरील आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची स्वतंत्ररित्या उमेदवारीची घोषणा केली होती. काँग्रेसने विधानसभेतील ४० जागांपैकी १६ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. या सोबतच काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशीही युती केलीय. त्यामुळे काही जागा गोवा फॉरवर्डसाठीही सोडाव्या लागणार आहे. त्यामुळेच काँग्रेस आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत जायला इच्छुक नाही हे स्पष्ट झालंय. पण संजय राऊत काँग्रेसला सोबत घेण्याबद्दल इतकं छातीठोकपणे विधान का करत होते हेही जाणून घ्यायला हवं, त्याचं कारण गेल्या आठवड्यातील काही घटनांमध्ये दडलंय.
मागच्याच आठवड्यात संजय राऊत आणि गोवा काँग्रेसच्या नेत्यांची गोव्यात एक बैठक पार पडली होती. यात गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करुन या बैठकीबाबत माहिती दिली होती. या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली होती. त्यामुळेच संजय राऊत काँग्रेसला सोबत घेण्यास आग्रही असल्याचं दिसून आलं होतं पण काँग्रेसनं या बैठकीनंतर काही तासातच बॅक टू बॅक दोन याद्या जाहीर केल्या आणि राऊतांना तोंडावर आपटलं. त्यामुळे आता गोव्यात काँग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष, तृणमूल आणि शिवसेना-राष्ट्रवादी अशी लढत होणार हे निश्चित झालं आहे.
पाहा व्हिडीओ