मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. तसेच हिंमत असेल, तर संजय राऊत यांनी गोव्यात निवडणूक लढवावी, असे आव्हानही दिले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे अपमान केला आहे, हे कोणाच्या मनाला पटलेले नाही. पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशा प्रकारे बोलताय, तर तुमची लायकी काय, अशी विचारणा करत, उत्पल पर्रिकर जर अपक्ष लढणार असतील, तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये. हीच खरी मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यात निवडणूक लढवावी
तुम्ही संजय राऊत यांची वक्तवे चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसले आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा. आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे, पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्यामुळे उत्पल पर्रिकर नाराज झाले आहेत. मनोहर पर्रिकर यांनी अनेक वर्षे याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपकडे तिकिटासाठी दावा केला आहे. भाजपने त्यांना तिकीट न देण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांना तिकीट नाकारणेही महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे.