- धनाजी कांबळे-
आपण नाटकाच्या तालमी बघितल्या असतील. काही हौसी कलाकारांनी तर तालमीत प्रत्यक्ष सहभाग घेतला असेल. कोल्हापुरात तालीम म्हटलं की, डोळ्यांसमोर कुस्ती अवतरते. पण आता राजकारणातही तालमी सुरू झाल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर वॉर सुरू केले असून, ज्या सोशल मीडियाच्या जोरावर भाजपा सत्तेत आले होते, तो सोशल मीडिया आज सगळेच वापरायला लागले आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने केलेल्या कारभाराचा आलेख जनतेपर्यंत पोचविण्यात सोशल मीडियाने मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, यंदा २०१९ मध्ये हाच मीडिया अनेकांचे पाप आणि पुण्य प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर काही मोजकी नावे नेहमी चर्चेत असतात. त्यापैकी राज ठाकरे हे एक नाव सातत्याने चर्चेत असते. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेतली, त्या दिवसांपासून राज ठाकरे विशेष चर्चेत आले आहेत. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आणि ‘राजा’चा दरबार रिकामा झाला, अशी चर्चा सोशल मीडियात जोरदार सुरू झाली. अशातच मनसेच्या वर्धापन दिनात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाºयांना आणि मनसेच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाºयांना एक चपराक लगावली. मार्मिक फटकेबाजी करून त्यांनी अनेकांचा समाचार घेतला. विशेषत: राज ठाकरे यांची भाषणाची शैली आणि आक्रमक मांडणी यामुळे तरुणांमध्ये एक मोठी क्रेझ सुरुवातीपासूनच राहिलेली आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी ११ आमदार निवडून आणले होते. अर्थात त्यातील एक एक करीत सगळेच दुसºया पक्षात गेले. काही नगरसेवक देखील राज ठाकरे यांना सोडून गेले असले, तरी राज ठाकरे यांचा आत्मविश्वास तसूभरही कमी झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले नाही. उलट असे कुणी कोणत्या पक्षात गेले म्हणून पक्ष संपत नसतो, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने घेतलेली आघाडी येत्या निवडणुकीत काय चमत्कार करते, हे पाहावे लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी व्हावी, यासाठी दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसने उत्तर भारतातील मतांवर डोळा ठेवून राज ठाकरे यांनी साइड ट्रॅक केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना काही जागा दिल्या जातील, असे बोलले जात होते. मात्र, आता ही सगळीच चर्चा थांबल्याने राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला मदत करतील, याबाबत उत्सुकता आहे. विशेषत: रोखठोक, सडेतोड आणि पॉवर पॉइंटच्या आधारे पुरावे दाखवत केलेल्या फटकेबाजीने एक चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये जरूर संचारले असण्याची शक्यता आहे. मात्र, या उत्साहाला, ऊर्जेला योग्य दिशा देण्याची आणि त्याचा राजकीय लाभ होण्याची आवश्यकता असते. अन्यथा निर्माण केलेली ताकद तिसºयाच कुणाला लाभकारक ठरल्यास सगळा खटाटोप नेमका कुणासाठी होता, असे बोलण्यास जनता कमी करत नाही, हे राज ठाकरे यांना माहीत आहेच. तरीही राज ठाकरे यांच्या फटकेबाजीमुळे कुणाला आनंदाचा उमाळा फुटला, तर ज्यांच्यावर त्यांनी टीका केली, त्या भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट बारामतीतून आल्याचे सांगून यांचा बोलवता धनी कोण होता, हे जनता जाणतेच, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीने देखील तत्परतेने स्क्रीप्ट बारामतीतून जाण्याची परंपराच असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आधी राज ठाकरे यांना कोण स्क्रीप्ट देत होतं, हे अवघ्या महाराष्ट्राला शत-प्रतिशत माहीत आहे, असाही पलटवार करण्यात आला. मात्र, या सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया या राज ठाकरे यांचे भाषण चांगले झाले, म्हणूनच आल्या होत्या, हे विसरता येणार नाही. राज ठाकरे यांनी केलेली फटकेबाजी अनेकांना आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. तशीच मनसेला नवी ऊर्जा देणारी होती. विशेषत: लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेले भाषण कार्यकर्ते कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोचवतात. नेमका कुणाला पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.