नवी दिल्ली: महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जातं असल्याचं चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे,' अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. या संदर्भातलं एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं आहे. प्रियंका चतुर्वेदींनी रिट्विट केलेल्या पत्रात त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधातील कारवाई मागे घेतल्याचा उल्लेख आहे. 'प्रियंका चतुर्वेदी ज्यावेळी राफेल डीलबद्दल पत्रकार परिषद घेण्यास आल्या होत्या, त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. या कार्यकर्त्यांविरोधात शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. मात्र आता याविषयी खेद व्यक्त करत संबंधितांची पुन्हा त्यांच्या पदांवर वर्णी लावण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शिफारशीनंतर ही कारवाई मागे घेण्यात येत आहे,' असा उल्लेख पत्रात आहे.
'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळतंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 3:32 PM