मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. 30 डिसेंबरला ईडीने बोलावले आहे, असे खडसे यांनी सांगितले.
मी किंवा माझा प्रतिनिधी उपस्थित राहिल. या आधी पुणे एसीबी, नाशिक एसीबी, आयटी, झोटिंग समिती यांच्यासमोर मी चौकशीला सर्व कागदपत्रांसह हजर राहिलेलो आहे. त्यांनी वारंवार मागितलेले कागदपत्र दिलेले आहेत. आताही ईडी जे जे कागद मागतील ते देण्यास तयार आहे.
ही नोटीस भोसरीच्या भूखंडावर आलेली आहे. हा भूखंड मी नाही, माझ्या पत्नीने खरेदी केलेला आहे. ही पाचवी चौकशी आहे. रेडी रेकनर दरानुसार पाच कोटी रुपयांत ही खरेदी झालेली आहे. आणखी चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे. यामुळे त्यांच्याकडून जी काही मागणी होईल, ते ईडीला सहकार्य केले जाईल. सीडीवर नंतर बोलेन, असे खडसे म्हणाले.
आजच्या वेळाला ईडीवरच बोलेन. याशिवाय अन्य काही सांगणार नाही. या पलिकडे आज बोलणार नाही. ईडीच्या कार्यालयात बोलविण्यात आलेले आहे. प्रफुल्ल लोढा हा दारु पिऊन काही बरळत असेल तर मला त्याची काही दखल घ्यायची गरज नाही, असेही खडसे यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करून भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. शुक्रवारी खडसेंनी ईडीची नोटीस आलेली नाही, आली की बोलेन असे सांगितले होते. गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला असताना शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.
यावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा देताना भाजपाने ईडी काढली आता आम्ही सीडी काढू, असा इशारा दिला होता. आता काँग्रेसचे आमदार आणि ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. आज खडसे, तर उद्या माझाही नंबर लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल असा इशाराही वड्डेटीवार यांनी दिला आहे.
आता सीडी ही निघणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा ईडी नोटीसीवर भाजपाला इशारा
खडसेंना आधीच ठाऊक होते...विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठविल्याची ओरड उठली होती. आता खडसेंना पाठविली आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्यामुळेच केंद्रावकडून हे दबावतंत्र वापरले जात आहे. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते जेव्हा ईडी पाठवतील तेव्हा मी सीडी दाखवेन असे खडसे म्हणाले होते. आता भाजपाने ईडी दाखविली आहे. यामुळे सीडीही निघणार आहे. हुकुमशाहीच्या राजकाराणाला काही अर्थ नाही असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.